नवी दिल्ली : देशात सध्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पक्षांतराच्या आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता उत्तर प्रदेशच्या राजकारणातूनही एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. सध्याच्या १८ व्या लोकसभेत समाजवादी पक्षाचे एकूण ३७ खासदार आहेत. या संख्येसह समाजवादी पक्ष हा लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी दावा केला आहे की, येत्या काळात समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसणार असून, संपूर्ण पक्षच भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजभर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जसे विविध प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांकडून फास आवळला जात आहे, तशी सपा नेत्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. खाण घोटाळा आणि गोमती रिवर फ्रंट प्रकल्पाशी संबंधित प्रकरणांमध्ये कोण लोक केंद्रस्थानी आहेत, हे संपूर्ण उत्तर प्रदेशला ठाऊक आहे. जेव्हा तपास पुढे सरकतो, तेव्हा काही लोकांच्या अडचणी वाढतात.
राजभर यांनी आपल्या विधानात सपाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांचाही विशेष उल्लेख केला. रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे, असा दावा करत त्यांनी सपा बॅकफूटवर गेल्याचे संकेत दिले.
ओम प्रकाश राजभर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक मोठी पोस्ट लिहून सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या परदेश दौर्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. अखिलेश यांच्या लंडन आणि पॅरिस दौर्यावर आक्षेप घेत राजभर म्हणाले, जर फिरायलाच जायचे होते, तर लंडन आणि पॅरिसला जाण्याऐवजी काशी, अयोध्या, मथुरा, नैमिषारण्य किंवा थेट मां विंध्यवासिनी धामामध्ये जायला हवे होते. जर अखिलेश यांनी उत्तर प्रदेशातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट दिली असती, तर येथील स्थानिक फूल विक्रेते, मिठाईवाले, छोटे हॉटेल व्यावसायिक आणि वाहतूकदारांना रोजगार मिळाला असता. अखिलेश यादव यांना आता उत्तर प्रदेशातील पर्यटन स्थळांपेक्षा लंडन आणि पॅरिस जास्त आवडायला लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.